जम्मू-काश्मीरच्या समीवर्ती भागात १६० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या घुसखोरांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याला हाय अॅलर्टचे आदेश देण्यात आले असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

काश्मीर सीमेवर गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. त्यातच आता हिवाळ्याचा मोसम सुरु झाल्याने या काळात सीमावर्ती भागातील कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन १६० दहशतवादी भारतीय हद्दीत घुसण्याच्या तयारीत आहेत. नगोटा कोअर भागाचा जनरल कमांडिंग ऑफिसरपदाचा कार्यभार स्विकारलेले लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह यांनी ही माहिती दिली.

पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओकेत २०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लेफ्ट. जनरल परमजीत सिंह हे सहभागी होते. लष्कराकडून आपली नेहमीची ठाणी सोडण्यात येणार नाहीत. तसेच दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी आपले लष्कर पुरेसे सक्षम आहे. खबऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानाच्या विविध ठिकाणांवरुन १४०-१६० दहशतवादी राज्यात पाठवले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

अजूनही पाकचा दहशतवादी चेहरा कायम असून त्यांनी आपल्या धोरणांत बदल केलेला नाही. घुसखोर आणि दहशतावादी कारवायांची कटकारस्थानं करण्यात पाकिस्तानी लष्कर आणि त्यांची गुप्तचर यंत्रण ‘आयएसआय’ यांचा हात असल्याचे सर्वश्रृत आहे. दरम्यान, डीजीएमओ स्तरावरील चर्चांमुळे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पाकिस्तानकडून आपले धोरण आणि इरादा बदलल्यानंतरच सीमेवरची ही परिस्थिती बदलेल अन्यथा हे असेच सुरु राहिल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

परमजितसिंह म्हणाले, आपले याबाबतीतले पूर्वानुमान असे आहे की, पाकिस्तानी सैनिक बर्फाने झाकलेल्या ठिकाणांहून तसेच अनधिकृत मार्गांनी घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसवण्याच्या तयारीत असतात. मात्र, त्यांना रोखण्यासाठी आपल्या सर्व आपातकालिन यंत्रणा सज्ज असून यासाठी आम्ही सर्व सुरक्षा एजन्सीजच्या संपर्कात आहोत.