प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीपदी असताना केलेल्या परदेश दौऱ्यांवरून त्या वेळी कितीही वाद झाले असले, तरी त्यांनी त्या वादटीकेला फारसे महत्त्व दिले नसल्याचेच त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीतील अखेरच्या विदेशवारीच्या खर्चावरून दिसून येते. राष्ट्रपतीपदावरून पायउतार होण्यापूर्वी काही दिवसच आधी प्रतिभाताईंनी केलेल्या परदेश दौऱ्यासाठी तब्बल १८ कोटी आठ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.
प्रतिभा पाटील यांनी गतवर्षी २९ एप्रिल ते ८ मे असा दहा दिवसांचा दक्षिण आफ्रिका आणि सेशल्स या दोन देशांचा दौरा केला होता. त्याकरिता त्यांच्या दिमतीला देण्यात आलेल्या बोईंग ७४७-४०० विमानाचे भाडे म्हणून तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपये एअर-इंडियाला देण्यात आले. या शिवाय, दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया येथे राष्ट्रपतींकरिता एक कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आला, तर दर्बन भेटीत २३ लाख ५५ हजार रुपये खर्च झाला.
आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एक डझन विदेश दौरे करून चार खंडांतील २२ देशांना भेटी दिल्या आणि त्यासाठी तब्बल २०५ कोटी रुपये खर्च झाला.
सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारा हा तपशील जाहीर झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्या वेळी, द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी असे दौरे आवश्यकच असतात, असे निवेदन राष्ट्रपतीभवनातून जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही खर्चाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर, त्यावरून वाद झाल्यानंतर राष्ट्रपतींनी आपला हा अखेरचा दौरा केला.
प्रतिभाताईंचा प्रवास खर्च
* बोईंग ७४७-४०० विमानाचे भाडे : १६ कोटी ३८ लाख रु.
* दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया येथे निवास : ७१ लाख ८२ हजार रु.
* प्रिटोरियातील प्रवास खर्च : ५२ लाख ३३ हजार रु.
* प्रिटोरियातील किरकोळ खर्च : २२ लाख १२ हजार रु.
* दर्बन येथे निवास : १८ लाख रु.
* दर्बन प्रवास: ५ लाख २७ हजार रु.
(प्रिटोरिया, दर्बन येथील भारतीय उच्चायुक्तांची कार्यालये, तसेच एअर-इंडियाने माहितीच्या अधिकाराखाली हा तपशील दिला.)