तेलंगणात पावसामुळे बुधवारी १९ जण मृत्युमुखी पडले. हैदराबादमध्ये सखल भागांत पाणी साचले असून, अनेक भागांत घरे कोसळली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सरकारने बुधवारी व गुरुवारी बाह्य़ रिंगण मार्गावरील खासगी संस्था, कार्यालये व अनावश्यक सेवा-सुविधा कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे. महापालिका प्रशासन व शहर विकासमंत्री के.टी.रामाराव व पशुसंवर्धनमंत्री तलासी श्रीनिवास यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आपत्कालीन बैठकीत मदतकार्याचा आढावा घेतला.

गगनपहाड या शमाशाबाद येथील भागात सकाळी घर कोसळून तीन जण ठार झाले. चांद्रयानगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिंत कोसळण्याच्या दोन घटनात दहा जण ठार झाले. चाळीस वर्षांची एक महिला व तिची मुलगी या इब्राहिमपट्टनम येथे घराचे छप्पर कोसळून ठार झाले. बृहत् हैदराबाद महापालिका हद्दीत जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. भद्राद्री व कोठागुंडेम जिल्ह्य़ात जोरदार पाऊस असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले.

मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी पोलीस पथके, आपत्ती प्रतिसाद दल यांना सज्जतेचे आदेश दिले आहेत.  राजधानीच्या काही भागांत सावधगिरी म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. विजयवाडा-हैदराबाद मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली. तेलंगणात बुधवारीही जोरदार पाऊस झाला असून गुरुवारीही पावसाची शक्यता आहे.