शीखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सज्जन कुमारने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीतील राजनगर भागातील  दंगलीत पाच शीख व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात माजी खासदार सज्जन कुमारसह सहा आरोपी होते. त्यांच्यावर २०१० मध्ये खटला सुरु झाला आणि त्यानंतर तीन वर्षांनी कनिष्ठ न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवून सज्जन कुमारला दोषमुक्त केले. याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती.

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी या खटल्यात निकाल दिला होता. हायकोर्टाने सज्जन कुमारसह सहा जणांना दोषी ठरवले होते. सज्जनकुमारला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सज्जन कुमारने शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, सज्जन कुमार व अन्य दोषींनी ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत. शरण येण्यासाठीची मुदत एक महिन्यांची वाढवून द्यावी , अशी मागणी करणारी याचिका सज्जन कुमारने हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी हायकोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली.