करोना विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक आरोग्य समस्या व आर्थिक पेचप्रसंग हाताळण्यासाठी अडीच लाख कोटीं डॉलर्सची मदत योजना जी २० देशांची बैठक घेऊन मंजूर करण्यात यावी, अशी मागणी भारतीय नोबेल विजेते अमर्त्य सेन व कैलाश सत्यार्थी तसेच अर्थतज्ञ कौशिक बसू यांच्यासह २२५ प्रमुख जागतिक तज्ज्ञांनी केली आहे.

या पत्रावर एकूण २२५ जणांच्या स्वाक्षऱ्या असून त्यात असे म्हटले आहे की, जी २० देशांची तातडीने बैठक घेण्यात यावी व त्यात आर्थिक-आरोग्य पेच हाताळण्यासाठी आर्थिक मदत मंजूर करावी. जी २० देशांनी २६ मार्च रोजी पाच लाख कोटींची योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. करोनामुळे आरोग्य समस्या बिकट झाली असून आर्थिक घसरणही मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. करोनाने आतापर्यंत ३ लाख ७५ हजार बळी घेतले असून लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. अमर्त्य सेन, कैलाश सत्यार्थी, कौशिक बसू यांच्यासह विविध खंडातील तज्ञ लोकांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या असून त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन, टोनी ब्लेअर, संयुक्त राष्ट्रांच्या माजी अध्यक्षा मारिया फर्नाडा एस्पिनोसा, श्रीलंकेच्या माजी अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंग, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन संस्थेचे सुमन बेरी यांचा समावेश आहे. पत्रात म्हटले आहे की, जी २० देशांची बैठक या वर्षी सौदी अरेबियात होणार आहे पण ती नोव्हेंबरशिवाय शक्य नाही. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन अडीच लाख कोटींची योजना मंजूर करावी. त्यामुळे गरीब देशांना करोनाचा सामना करणे शक्य होईल.

हातात वेळ कमी

जागतिक आरोग्य व आर्थिक आपत्ती हाताळण्यासाठीची वेळ हातातून निसटून चालली आहे . ४४ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले असून २६.५० कोटी लोक कुपोषणाने ग्रस्त आहेत.  जी २० देशांची वेळीच कृती केली नाही, तर मंदीसदृश स्थिती वाढत जाईल व अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना धक्का लागेल. गरीब व वंचित लोकांना भवितव्य राहणार नाही. न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांनी म्हटले आहे की, नाणेनिधीच्या अंदाजानुसार आताच्या परिस्थितीचा अंदाज घेता २.५ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना आवश्यक आहे.