दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्याचे पालन न केल्याचा आरोप काँग्रेसने सोमवारी केला आणि हा मुद्दा संसदेत व संसदेबाहेर मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.

पंतप्रधानांनी देशाला ‘आर्थिक अनागोंदीत’ ढकलल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले, की नवे चलन छापण्यासाठी आरबीआय कायद्यानुसार आवश्यक असलेली अधिसूचना जारी न करण्यात आल्यामुळे २ हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनात आणणे हे ‘बेकायदेशीर कृत्य’ आहे. त्यासाठी कायद्याच्या तरतुदीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नोटा बदलून घेणाऱ्यांच्या बोटांवर पुसली न जाणारी शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावरही शर्मा यांनी टीका केली. एकत्रित विरोधी पक्ष निश्चलनीकरणाचा मुद्दा संसदेत जोरकसपणे मांडेल, तसेच तो लोकचळवळीचा मुद्दाही बनवेल, असे काँग्रेसने सांगितले. पंतप्रधान जाणूनबुजून महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करत असून, स्वत:ला काळ्या पैशांविरुद्धचा लढवय्या भासवून गरिबांना फसवत आहेत, असेही शर्मा म्हणाले.

देशाला आर्थिक अनागोंदीत ढकलण्यास पंतप्रधान पूर्णपणे जबाबदार असून, देशात अघोषित आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे, असाही आरोप त्यांनी केला.