अलीगढ मुस्लिम विद्यापीठ अर्थात AMU च्या तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठाने बडतर्फ केले आहे. हिज्बुलचा दहशतवादी मन्नान वानी याचा खात्मा झाल्यानंतर या तीन विद्यार्थ्यांनी शोकसभा घेऊन नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याला ठार केल्यानंतर त्याच्यासाठी शोकसभा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना विद्यापीठाने बडतर्फ केले आहे.

मन्नान वानी ठार झाल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे १५ विद्यार्थी विद्यापीठाच्या केनेडी हॉलमध्ये एकत्र आले. त्यावेळी त्यांनी मन्नान वानीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली. तसेच विद्यापीठाचे नियमही मोडले. त्यांनी नियमांचा भंग करत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यासाठी सभा बोलावली. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रोफेसर मोहसिन खान यांनी सांगितले. तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी यांनी हे विद्यार्थी मन्नान वानीसाठी जमले नव्हते, जी सभा त्यांनी आयोजित केली ती नियमांना धरून नव्हती असे म्हटले आहे. या तीन विद्यार्थ्यांसह आणखी चार जणांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

गुरूवारी हंदवाडामधील शाहगूंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी याचा समावेश आहे. वानी (वय २७) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.