११ ते १३ मार्च या दरम्यान वेतवाढ आणि इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र सरकारशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली. ज्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने केली आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. मुंबईत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांचे प्रतिनिधी आणि इंडियन बँक असोसिएशनचे प्रमुख राजकिरण राय यांच्यात चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांना बँक असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळए ११ मार्चपासून पुकारण्यात आलेला संप स्थगित करण्यात आला. इंडियन बँक असोसिएशनचे महासचिव सी. एच. वेंकटचेलम यांनी ही माहिती दिली.

११ मार्च ते १३ मार्च या दरम्यान पुकारण्यात आलेल्या संपामुळे ग्राहकांची मोठी कोंडी झाली असती. कारण बँक कर्मचाऱ्यांनी संपासाठी हा कालावधी निवडला. त्यानंतर १४ मार्चला दुसरा शनिवार असल्याने आणि १५ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत. तर १० मार्च रोजी होळीची सुट्टी बँकांना असल्याने बँका बंद असणार आहेत. जर संप स्थगित झाला नसता तर १० मार्च ते १५ मार्च म्हणजेच सलग सहा दिवस बँका बंद राहिल्या असत्या. मात्र संपाला स्थगिती दिली गेल्याने आता असं होणार नाही.

काय मागण्या आहेत ?

आपल्या अनेक मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशनकडून संपाची हाक देण्यात आली होती. कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा अशा मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली होती. मात्र आता याच मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. ज्यामुळे बँक कर्मचारी संपावर जाणार नाहीत.