जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर महामार्गावर वनविभागाच्या एका सुरक्षारक्षक आणि सीआरपीएफ जवानावर गोळीबार करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा गुरूवारीही शोध घेण्यात येत आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी झज्जर कोटली क्षेत्रातील झुडुपांमध्ये गायब झाले होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या एका स्थानिकाच्या घरात शिरून दहशतवाद्यांनी बिस्कीट आणि सफरचंद नेल्याचे समोर आले आहे. ५ दिवसांपासून आम्ही उपाशी असल्याचे या दहशतवाद्यांनी त्या नागरिकाला सांगत त्याला धमकावत खाण्याच्या वस्तू नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

झज्जर आणि परिसरातील जंगलांमध्ये लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने बुधवारी त्याच्या घरात ३ दहशतवादी घुसल्याचे सांगितले. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास शस्त्रास्त्रांसह ३ व्यक्ती माझ्या घरात घुसले आणि आमच्याबाबत कोणाला सांगू नको असे म्हणत धमकावले. आम्ही ५ दिवसांपासून उपाशी आहोत, असे त्यांनी मला सांगितले. नंतर त्यांनी बिस्कीट आणि सफरचंद घेतले. त्याचबरोबर काही कपडेही ते घेऊन गेले. दहशतवाद्यांनी कार मागितली आणि त्या बदल्यात पैसे देऊ असे सांगितले. परंतु, माझ्याकडे कार नव्हती. त्यानंतर ते दहशतवादी तेथून गेले, असे तो व्यक्ती म्हणाल.

या परिसरात हेलिकॉप्टर, ड्रोन तसेच इतर माध्यमांचा वापर करून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. नगरोटा-झज्जर कोटली महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.