जम्मूमधील चन्नी हिम्मत परिसरातील एका झोपडीत ३० लाख रुपये रोख रक्कम सापडली आहे. पोलिसांनी यासंबंधी रोहिंग्या कुटुंबातील तीन सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीदरम्यान ही रोख रक्कम सापडली आहे. पोलिसांना झोपडीत रोख रक्कम असल्याची खबर मिळाली होती.

सापडलेल्या रोख रकमेतील २७ लाख रुपयांमध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा आहेत. म्यानमारहून आलेल्या एखाद्या रोहिंग्या कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. रोहिंग्या भारतात छोट्या-मोठ्या नोकऱ्या करतात. त्यामुळे एवढी रक्कम त्यांच्याकडे मिळणं संशय निर्माण करणारं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम इस्माइल (१९) आणि नूर आलम (२१) यांचे असल्याचं रोहिंग्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलंय की, इस्माइल आणि नूर आलम दोन ते तीन दिवसांपूर्वी बांग्लादेशला निघून गेले आहेत. मात्र ताब्यात घेण्यात आलेले रोहिंग्या अधिकृत पासपोर्ट नसतानाही इस्माइल आणि नूर आलम बांग्लादेशला कसे गेले हे सांगू शकलेले नाहीत. दोघेही गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जम्मूमध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली रोख रक्कम एका प्लास्टिक कंटेनरमध्ये कपाटाच्या खाली सुटकेसमध्ये लपवण्यात आली होती. दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्फत पैसा, ड्रग्ज, चोरी, तस्करी अशा सर्व शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत.