ब्रिटनमध्ये लिसेस्टर येथे एका तीन मजली इमारतीत स्फोट होऊन आग लागल्याने चार जण ठार झाले असून यात दहशतवादाची शक्यता फेटाळण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हा स्फोट मोठा होता. काल सायंकाळी लंडनपासून १४३ कि.मी. अंतरावर असलेल्या लिसेस्टर येथील हिंकले रोड भागात व्यावसायिक व निवासी गाळे असलेल्या इमारतीत हा स्फोट झाला असून या भागात गुजराती लोकांची संख्या जास्त आहे.

स्फोटात ४ जण ठार झाले, नंतर या इमारतीला आग लागून दोन मजली फ्लॅट जळून गेला. एकूण चार जण ठार झाल्याचे समजले असून एक गंभीर जखमी आहे, अशी माहिती लिसेस्टर पोलिसांनी दिली. पोलिस अधीक्षक शेन ओनिल यांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

मदतकार्य सुरू असून आणखी लोक त्यात अडकले असण्याची शक्यता आहे. ब्रिटिश पोलिसांनी सांगितले, की  पोलिस, लिसेस्टर अग्निशमन दल सेवा यांची संयुक्त चौकशी समिती नेमण्यात आली आहे. प्रसारमाध्यमे व लोकांनी आगीबाबत अंदाजाने विधाने करू नयेत असे आवाहन आम्ही केले आहे. आपत्कालीन सेवेने सांगितले, की सायंकाळी सात वाजता स्फोट झाले, त्यानंतर सहा अग्निशमन बंब तेथे पाठवण्यात आले. दोन मजली इमारत कोसळली असल्याचे अग्निशमन प्रवक्तीने सांगितले. मदतकार्य करताना साठ घरांना  कडे करण्यात आले होते. या भागात काही अपार्टमेंट व दुकाने होती, त्यात एक कबाब रेस्टॉरंट व किराणा दुकानाचा समावेश होता. हरीश पटणी हे पिझ्झा दुकानात होते. त्यांनी स्फोटामुळे इमारत थरथरल्याचे सांगितले.