अरूणाचल प्रदेशमध्ये भूस्खलनामुळे आयटीबीपीच्या बसवर दरड कोसळून झालेल्या अपघातात ४ जवानांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत ६ जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना लोअर सिआंग जिल्ह्यातील बसर अकाजन मार्गावर घडली. पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरावरून आलेला एका मोठा दगड थेट आयटीबीपीच्या बसवर जाऊन पडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजता लोअर सिआंगमधील मुख्यालय लिकाबलीपासून पाच किमी लांब अंतरावर ही दुर्घटना घडली. भारत-तिबेट सीमा पोलिसाचे (आयटीबीपी) जवान पश्चिमी सिआंग जिल्ह्यातील बसरवरून सिआंगला जात होते.

लोअर सिआंगचे पोलीस अधिक्षक सिंगजतला सिंग्फो म्हणाले की, डोंगरावरून एक मोठा दगड आयटीबीपीच्या २० जवानांना घेऊन जात असलेल्या मिनी बसवर जाऊन पडला. दलाच्या चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. आयटीबीपी आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त बचाव पथकाने आतापर्यत तीन मृतदेह बाहेर काढले असून यासाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे.

राज्यात मागील पाच दिवसांत पावसामुळे अशी घटना होण्याची ही दुसरी वेळी आहे. या हंगामात भूस्खलनामुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, डोंगरावरून सातत्याने दरड कोसळत असल्याने मदत अभियान राबवण्यात अडचण येत आहे.

रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे आयटीबीपीची बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. त्याचवेळी डोंगरावरून आलेला एक मोठा दगड या बसवर जाऊन आदळला. या दुर्घटनेत आयटीबीपीसह ६ इतर कर्मचारीही जखमी झाले आहेत. यातील दोघांची परिस्थिती गंभीर आहे.

गंभीर रूग्णावर लिकाबली येथील लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. गंभीर जवानांना विमानाने दिब्रगड येथे नेण्यात आले आहे.