केरळच्या इडुक्की जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. ४ दिवसांपासून हे कुटुंबिय गायब होतं, अशी प्राथमिक माहिती आहे. मृतदेहांवर जखमा आढळल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चारही मृतदेह एकाच खड्डयात पुरलेले होते.

कृष्णनन (५२), पत्नी सुशीला(५०), मुलगी अर्शा(२१) आणि मुलगा अर्जुन (१९) अशी मृतांची नावं आहेत. गेल्या ४ दिवसांपासून या घरातील सदस्यांना बघितलं नव्हतं असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. २९ जुलैनंतर यांची हत्या झालेली असू शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुंडनमुडी येथे एका निर्जनस्थळी हे कुटुंब राहत होतं. आज सकाळी शेजारी आणि काही नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले असता त्यांना जमीनीवर आणि भिंतींवर रक्ताचे डाग दिसले. तातडीने पोलिसांनी माहिती देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मागे कंपाऊंडमध्ये खणलेली जमीन दिसली. तेथून माती हटवल्यानंतर एकावर एक अशा अवस्थेत चार मृतदेह आढळले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.