इराकच्या उत्तरेकडील मोसूल शहराजवळ एका प्रकल्पावर काम करीत असलेल्या ४० भारतीयांचे अपहरण झाल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबराउद्दीन यांनी बुधवारी सांगितले. इराकमधील विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनंतर भारतीयांचे अपहरण झाल्याचे स्पष्ट असून, परराष्ट्र खाते इराकमधील सरकार आणि इतर संस्थांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. अपह्रत भारतीयांना कोठे ठेवण्यात आले आहे, याबद्दल अद्याप काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून इराकच्या उत्तरेकडील तिकरित, मोसूल शहरांमध्ये सुन्नी दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात येत असून, त्याचे लोण बगदाद शहराजवळ पोहोचले आहे. अमेरिकेसह अन्य अनेक देशांनी इराकमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी या भारतीयांचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
केंद्र सरकारने इराकमध्ये याआधी काम केलेले राजदूत सुरेश रेड्डी यांना तातडीने पुन्हा एकदा इराकमध्ये पाठवले आहे. इराकमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबद्दल केंद्र सरकारने याआधीच चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकारी इराकमधील भारतीय दूतावास आणि तेथील सरकारच्या संपर्कात आहेत.
अग्रलेख : पाप कुणाचे, फळ कुणा?