तंत्रज्ञान, संशोधन, धोरणनिर्मिती या क्षेत्रातील अव्वल दर्जाच्या व्यक्तींची नावे फोर्बस्ने जाहीर केली असून त्यात भारताच्या किंवा भारतीय वंशाच्या ४४  जणांचा समावेश आहे. जगातील ३० वर्षांखालील २० क्षेत्रांतील ६०० व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
‘हॅरी पॉटर’मधील अभिनेत्री एम्माम वॉटसन, अभिनेता झ्ॉर एफ्रॉन, बास्केटबॉलपटू जेम्स हार्डन व एनबीए स्टार ख्रिस पॉल यांचा त्यात समावेश आहे. एकूण ४४ भारतीयांनी विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली आहे, त्यात जलशुद्धीकरण, अन्न सुरक्षा अशा अनेक गटात ही निवड करण्यात आली आहे.
भांडवली गटात नितेश बंटा (वय २८) यांची निवड झाली असून ते रो ड्राफ्ट व्हेंचर्सचे सहसंस्थापक आहेत. यात विद्यार्थी उद्योजकांना कंपनी सुरू करण्यासाठी २५ हजार डॉलर दिले जातात. ग्राहक तंत्रज्ञान विभागात अंकुर जैन (वय २४) यांना ‘ह्य़ुमिन’ या अ‍ॅपसाठी गौरवण्यात आले आहे; ते सोशल नेटवर्क असून त्याच्या मदतीने संपर्क सुविधा मिळतात. अविनाश गांधी (वय २६) यांनी हॉलिवूडमध्ये विल्यम मॉरिस एंडेव्हर या टॅलेंट संस्थेत चांगले काम केले आहे. पार्थ उनावा (वय २२) हे बेटर वॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून आधारासाठी ज्या लोकांना कुबडय़ा वापराव्या लागतात त्यांना काखेत त्रास होऊ नये यासाठी तशा कुबडय़ा तयार केल्या आहेत.
किरकोळ विक्री गटात अमन अडवाणी (वय २६ ) यांनी ‘मिनिस्ट्री ऑफ सप्लाय’ स्थापन केली असून ती पुरूषांची फॅशन कंपनी आहे. त्यात नासाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित शर्ट तयार केले जातात. खुल्या पुरस्कृततेच्या क्षेत्रात इशवीन आनंद (वय २९) यांनी पुरस्कृततेसाठी पहिला ऑनलाइन मंच उपलब्ध केला आहे. या गटात सध्या क्रिकेट कर्णधार एम.एस.धोनी व एफ १ टीम फोर्स इंडिया सहभागी आहेत.
जैवतंत्रज्ञान विषयात विजय चुडासमा (वय२८) याने औषधे तयार करण्यात मोठी कामगिरी केली आहे. विनित मिश्रा (वय२७) हे शेफ वॉटसन मशिन तयार करीत असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन रेसिपीज तयार करीत आहेत. विवेक रवीशंकर (वय २७) यांनी ‘हॅकर रँक’ ही सेवा कंपनी स्थापन केली असून त्यात फेसबुक, अ‍ॅमेझॉन, झिंगा, वॉलमार्ट, व्हाइट हाऊस हे त्यांचे ग्राहक आहेत. दीपिका कुरूप (वय १६) हिने सूर्यप्रकाश व टिटॅनियम डायॉक्साईड व सिल्व्हर नायट्रेटने जलशुद्धीकरण करण्याची पद्धत शोधली आहे व ती खर्चिक नाही. एमआयटीचे सह प्राध्यापक निखिल अगरवाल , बौद्धिक संपदा विभागाचे सचिव विक्रम अय्यर, ओहिओचे प्रतिनिधी नीरज अडवाणी, प्रतिजैविक रोधक प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांचे करार सल्लागार राहुल रेखी (वय २३) यांचा समावेश आहे.