यंदा देशात उष्णतेचा कहर सुरु असून राजस्थानातील चुरू येथे आज (दि.३) तब्बल ५०.३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या तापमानाने जगातील सर्वाधिक तापमानाचा विक्रमच प्रस्थापित केला आहे. सलग दोन दिवस येथे तापमानाने पन्नाशी ओलांडली आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर भारतात उष्णतेची भीषण लाट आली असून देशातील इतर भागांमध्येही पुढील काही दिवस सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे. राजस्थानासह पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, बिहार, झारखंड, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

दरम्यान, राज्यातील नागूपर शहरात काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक ४७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन चंद्रपूरमध्ये तब्बल ४८ डिग्री तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर उष्णतेचा हा विक्रमही मोडीत काढत आज राजस्थानातील चुरु येथे तब्बल ५०.३ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.