पाकिस्तानचा झेंडा असलेला शर्ट परिधान करून काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ११ युवकांनी पाकिस्तानचा झेंडा असलेला शर्ट परिधान करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

धनबाद येथील निरसा ठाण्याचे प्रभारी सुषमा कुमार यांनी सांगितले की, रांचीपासून १८० किमी पूर्व दिशेला बैदपूर गावात कलम १४४ कायम ठेवण्यात आले आहे. इतर पाच आरोपींचा शोध घेण्यात येत असून याप्रकरणी छापेमारीही सुरू आहे.

मंगळवारी पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचे तळ भारतीय हवाई दलाने नष्ट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर भारतातून हवाई दलाचे मोठे कौतुक करण्यात येत होते. त्याचवेळी काहींना सोशल मीडियावर या ११ युवकांचे पाकिस्तानचा झेंडा असलेले शर्ट परिधान केल्याचे छायाचित्र दिसून आले होते. त्यानंतर संतापलेल्या जमावाने छायाचित्रातील ११ युवकांच्या निवासस्थानांना घेरुन तोडफोड केली होती.

देशद्रोहाच्या आरोपांव्यतिरिक्त सर्व संशयितांविरोधात आयपीसी कलम १५३ अ आणि २९५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.