सूर्याच्या चढत्या पाऱ्याची पर्वा न करता कर्नाटकातील मतदारांनी मतदानाचा हक्क उत्साहाने बजावल्याने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल ६५ टक्के मतदान झाले. कर्नाटक विधानसभेच्या २२३ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. राज्यभरातील उष्म्याचा तडाखा लक्षात घेऊन सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या मतदानाचा कालावधी एका तासाने म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्यात आला. या मतदानाचा मोठय़ा प्रमाणावरील फायदा सत्ताधारी भाजप व पुनरुत्थान करण्यास उत्सुक असलेला काँग्रेस पक्ष यापैकी कोणाला होतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. ८ मे रोजी ही मतमोजणी होणार आहे.
मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांसमोर लांबलचक रांगा लावल्या होत्या. मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, सिद्धगंगा मठाचे अधिपती शिवकुमार स्वामी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा हा उत्साह दुपारी मात्र काहीसा मावळला. राज्यभर सर्वत्र असलेल्या भयंकर उकाडय़ामुळे दुपारी एक वाजेपर्यंत २५ ते ३० टक्के मतदानाची नोंद झाली, मात्र दुपारनंतर मतदानाचा जोर वाढला. या उष्म्याची नोंद घेत निवडणूक आयोगाने मतदानाचा कालावधी एका तासाने वाढविला. राज्यभरातील सुमारे चार कोटी ३६ लाख मतदारांपैकी ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
एकूण ५२ हजार मतदान केंद्रांपैकी १० हजार मतदान केंद्रे अतिसंवेदनशील तर १४ हजार २०० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. बेलारी मतदान केंद्रावर निदर्शने करणारा एक मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र अशा काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. २२३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण २ हजार ९४८ उमेदवार नशीब आजमावत आहेत, यात केवळ १७० महिला उमेदवार आहेत. म्हैसूर जिल्ह्य़ातील पेरियापटणा येथील भाजपच्या उमेदवाराचा गेल्या आठवडय़ात मृत्यू झाल्याने तेथे २८ मे रोजी मतदान होणार आहे.

काँग्रेसला ११६ जागा?
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अनपेक्षितपणे काँग्रेसच्या बाजूने मतदान केले असून २२४ पैकी ११० ते ११६ जागा त्यांच्या पारडय़ात पडण्याचा अंदाज सीएनएन आयबीएन या वृत्तवाहिनीने व्यक्त केला आहे. या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसण्याची भीती असून त्यांना ४३ ते ५० जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवली  आहे. वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणानुसार धर्मनिरपेक्ष जनता दलाला ४३ ते ५३ जागांवर समाधान मानावे लागेल, तर इतर पक्षांना १६ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. चुकीचे उमेदवार निवडल्याचा फटकाही पक्षांना बसणार असल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

२१ कोटी आणि दारू जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत २१ कोटी रुपये रोख आणि ७.७९ कोटी रुपये किमतीची ११ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. शिवाय पेड न्यूजच्या ४२ घटनाही उघडकीस आल्याचे निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान ७६ पेड न्यूजच्या प्रकरणांचा आढावा घेण्यात येऊन ६१ प्रकरणी नोटिसा पाठविण्यात आल्या, तर ४२ प्रकरणांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण जागा     – २२४
भाजप     – ११०
काँग्रेस     – ८०
धर्मनिरपेक्ष जनता दल     -२८
अन्य     – ६