नक्षल कारवायांना न जुमानता पहिल्या टप्प्यात नागरिकांचा उत्साह

नवी दिल्ली : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलवादग्रस्त बस्तर विभाग आणि राजनांदगाव जिल्ह्य़ासह १८ मतदारसंघांमध्ये सोमवारी ६० ते ७० टक्के मतदान झाले.

सोमवारच्या मतदानादरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात तीन ठिकाणी चकमकी झडल्या, तसेच एका ठिकाणी आयईडीचा स्फोट झाला. तथापि, कठोर सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर याचा काही परिणाम झाला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ७० टक्के मतदानाची नोंद करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. १८ मतदारसंघांमध्ये ६०.४९ टक्के मतदान झाले असून हा आकडा वाढू शकतो, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी सांगितले.

मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी असलेल्या १० मतदारसंघांमध्ये सुमारे ५२ टक्केमतदान नोंदवले गेले; तर सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी वेळ असलेल्या मतदारसंघांमध्ये ७०.०८ टक्के मतदान झाले. सर्व मतदारसंघांतील मतदानाबाबत अंतिम अहवाल मिळाल्यानंतर अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात येईल, असे साहू म्हणाले.

पहिल्या टप्प्यातील १९० उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमण सिंह (राजनांदगाव मतदारसंघ) यांचा समावेश आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ९० पैकी १८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची सरासरी ५८.५५ टक्के होती, असे आयोगाने सांगितले.

बिजापूर जिल्ह्य़ाच्या पामेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांशी चकमकींच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कोब्रा बटालियनचे ५ कमांडो जखमी झाले. तर सुकमा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांनी चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नारायणपूर मतदारसंघात मैनुराम व त्याची पत्नी राजपट्टी या शरण आलेल्या नक्षलवादी दाम्पत्याने मतदान केले.

दुसऱ्या टप्प्यात ७२ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, निकाल ११ डिसेंबरला जाहीर केला जाईल.

दहशतीतही मतदारांचा चांगला प्रतिसाद

* दंतेवाडा जिल्ह्य़ाच्या काटेकल्याण भागात सोमवारी सकाळी नक्षलवाद्यांनी एका आयईडीचा स्फोट घडवून आणला, मात्र यात कुणीही जखमी झाले नाही. कांकेर व बिजापूर येथे प्रत्येकी दोन असे एकूण चार आयईडी हस्तगत करण्यात आले.

* नक्षलवादग्रस्त दुर्गम भागांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोक त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याबाबत उत्साही दिसत होते. सुकमा जिल्ह्य़ातील पालम आडगु खेडय़ात १५ वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच मतदान झाले.