पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये सोमवारी ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या वेळी तिसऱ्या टप्प्यासारखा हिंसाचार झाला नसला, तरी निवडणुकीशी संबंधित घटनांमध्ये सुमारे २३० लोकांना अटक करण्यात आली.

मतदान झालेल्या ४९ मतदारसंघांमध्ये उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील ३३, तर हावडा जिल्ह्य़ातील १६ मतदारसंघांचा समावेश आहे. आजच्या मतदानात ४० महिलांसह ३४५ उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे.

उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ात जमावबंदी आदेशाचा भंग करणे, मतदारांना दहशत घालणे किंवा मतदान केंद्रात गर्दी करणे अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान २३१ जणांना अटक करण्यात आल्याचे बराकपूरचे पोलीस आयुक्त नीरज सिंग यांनी सांगितले.

हावडा उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजपच्या उमेदवार आणि अभिनेत्री रूपा गांगुली यांनी बामनगाछी येथील मतदान केंद्रावर एका महिलेला धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. गांगुली या निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घालत असल्याचे, तसेच तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते बूथवर गर्दी करत असल्याचा आरोप करत असल्याचे दृश्य दूरचित्रवाहिन्यांनी दाखवले.

डमडम उत्तर मतदारसंघात माकपचे उमेदवार तन्मय भट्टाचार्य यांच्या मोटारीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.