देशाची राजधानी दिल्लीमध्ये करोन संसर्गाचे प्रमाण अतिशय वाढले आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमालीची वाढली आहे. बुधवारी दिवसभरात१३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने आता नियम आता अधिक कडक करणं सुरू केलं आहे. त्यानुसार आता मास्क घातल्यास दिल्लीकरांना आता दोन हजार रुपये दंड असणार आहे.

आतापर्यंत दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकरला जात होता. मात्र नागरिक तरी देखील मास्क वापराबाबत गंभीर झालेले नसल्याचे दिसून आल्याने व वाढता करोना संसर्ग पाहता दंडाची रक्कम आता दोन हजार रुपये केली आहे.

दरम्यान, दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लवकरच अतिरिक्त ३०० आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय रविवारी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दिल्ली पालिकेच्या अखत्यारीतील काही रुग्णालये कोविड रुग्णालयांत रूपांतरित करण्यात येणार असून मनुष्यबळाच्या अभावामुळे डॉक्टर आणि निमवैद्यकीय दले तैनात केली जाणार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.