ओडिशामधील कट्टक जिल्ह्यात ३० फूट खोल पाण्याच्या पाईपमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची सहा तासानंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याची सुटका करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात आलं. ५० वर्षीय कृष्णा मुदुली कट्टक पोलीस कॉलनीतील पाण्याची पाईपलाइन स्वच्छ करण्यासाठी खाली उतरले होते. यावेळी २५ ते ३० फुटावर ते अडकले.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदुली पाईपमध्ये उतरले असल्याची कोणतीच माहिती नसलेल्या पम्प ऑपरेटने पम्प सुरु केला. पाण्याच्या दबावामुळे मदुली अजून पाच फूट खाली गेले. ते अशा परिस्थितीत अडकले होते की, सुटका करुन घेणं अशक्य होतं. अखेर सहा तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यांना तात्काळ एससीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेमुळे पुन्हा एकदा बांधकाम आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुदुली यांच्या बचावकार्यात अग्निशमन दलाचे १०० कामगार सहभागी होते. सोबत रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलीसदेखील होते. बचावकार्यादरम्यान पोलिसांनी रिंग रोडवरील वाहतूक थांबवली होती, ज्यामुळे गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. बचावकार्य पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली होती.

बचावकार्यादरम्यान, मुदुली यांना ऑक्सिजन आणि पाणी पुरवण्यात येत होतं. सहा तासांचा हा वेळ मुदुली यांच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता. बाहेर पडल्यानंतर आपण मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडल्यासारखं त्यांना वाटत होतं.