माणूस निरीक्षणातून शिकतो हे तर खरेच पण ब्रिटिश संशोधकांच्या मते यंत्रेही निरीक्षणातून शिकू शकतात. नैसर्गिक किंवा कृत्रिम अशी कुठलीही प्रणाली नेमकी कशी काम करते याचे निरीक्षण यंत्रे करू शकतात. त्यासाठी त्यांना काय निरीक्षण करायचे आहे हे सांगितले जात नाही.
शेफिल्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते संगणक वैज्ञानिक अॅलन टय़ुरिंग यांच्या संशोधनातून ही प्रेरणा मिळाली आहे. टय़ुरिंग यांनी यंत्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता असते का याबाबत टय़ुरिंग चाचणी विकसित केली होती. माणसापेक्षा ते वेगळे वागतात किंवा नाही हे बघण्याचा त्यात उद्देश होता. या चाचणीत प्रश्नकर्ता एका खोलीतील माणूस व दुसऱ्या खोलीतील यंत्र यांच्याशी संदेशांची देवाणघेवाण करतो. नंतर प्रश्नकर्ता यापैकी माणूस कोण व यंत्र कोण याचा शोध घेतो कारण संदेश पाठवताना त्याला ते सांगितलेले नसते. जर ते वारंवार ओळखता आले नाही तर यंत्राने ती चाचणी जिंकली, असे मानले जाते व त्या यंत्रावर मानवी पातळीची बुद्धिमत्ता आहे असे समजतात.
डिपार्टमेंट ऑफ ऑटोमॅटिक कंट्रोल अँड सिस्टीम्स इंजिनियरिंग व शेफील्ड रोबोटिक्स या शेफील्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. रॉड्रीच ग्रॉस यांनी सांगितले, की आमच्या संशोधनात टय़ुरिंग चाचणीचा आधार घेण्यात आला आहे. त्यात यंत्र कसे काम करते याचा अभ्यास केला आहे. काही यंत्रमानवांना त्यासाठी निरीक्षणाखाली ठेवले होते. त्यांच्या हालचाली कुठल्या नियमानुसार आहेत हे शोधून काढायचे होते, त्यासाठी आम्ही यंत्रमानवांचा दुसरा संच तयार केला, तो शिकण्याची पात्रता असलेला होता. त्यांनाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सर्व यंत्रमानवांच्या हालचाली नोंदवून हालचालींची माहिती प्रश्नकर्त्यांना देण्यात आली. त्यात टय़ुरिंग चाचणीप्रमाणे प्रश्नकर्ते हे मानव नव्हते तर संगणक आज्ञावली ते काम करीत होती. शिकवलेल्या यंत्रमानवांनी इतर यंत्रमानवांच्या हालचालींची नोंद ठेवली. यात टय़ुरिंग चाचणीचा वापर करून आता मानवाला यंत्रांना नेमके कशाचे निरीक्षण करायचे हे सांगावे लागणार नाही, ते निरीक्षणतून शिकतील. यंत्रमानवाने पिकासोसारखे चित्र काढावे असे तुम्हाला वाटत असेल, तर पारंपरिक शिकाऊ यंत्रे ते चित्र पिकासोच्या चित्राशी थोडे तरी जुळते की नाही हे सांगू शकतात. पण त्यासाठी पिकासोचे चित्र कसे असते याचा अलगॉरिथम त्याला सांगावा लागेल पण टय़ुरिंग लर्निगमध्ये यंत्रमानवाला आधी असे शिक्षण द्यावे लागणार नाही. यात पिकासोसारखे चित्र आहे की नाही याचा शोध यंत्रमानवत प्रश्नकर्त्यांच्या भूमिकेतून घेणार आहेत. टय़ुरिंग लर्निग चाचणीतून विज्ञान व तंत्रज्ञानात बरीच प्रगती होऊ शकते. नैसर्गिक व कृत्रिम प्रणालींवर नियंत्रण त्यामुळे ठेवता येईल पण यातून वर्तनाचा अंदाज मात्र करता येत नाही, असे ग्रॉस यांनी सांगितले.