देशात करोनाच्या संसर्गाची प्रकरणं आता कमी होताना दिसत आहेत. गेल्या सहा महिन्यांतील दिवसभरातील करोनाबाधितांची आकडेवारी आता १७ हजारांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर मृतांच्या रोजच्या संख्येतही घट झाली असून ती ३०० हून कमी झाली आहे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

भूषण म्हणाले, “करोनाविरोधातील युद्धामध्ये आपण महत्वाचा टप्पा गाठला आहे. सहा महिन्यांनंतर करोनाची दैनिक प्रकरणं आता १७ हजारपेक्षा कमी झाली आहेत. रोजच्या मृतांचे प्रमाणही घटले असून ते ३०० पेक्षा कमी झाले आहे. ५५ टक्के प्रकरणांमध्ये मृतांचे वय हे सरासरी ६० वर्षे होते किंवा त्यापेक्षा अधिक होते. तर ७० टक्के पुरुष रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.”

ब्रिटनसाठीची विमानप्रवास स्थगिती आणखी वाढणार; नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांचे संकेत

लिंग आधारित करोनाच्या प्रकरणांचे विश्लेषण केल्यास ६३ टक्के पुरुष आणि २७ टक्के महिलांचे प्रमाण होते. वयाबाबत विचार केल्यास ८ टक्के प्रकरणं १७ वर्षांपेक्षा कमी, १३ टक्के प्रकरणं १८-२५ वर्षे, ३९ टक्के २६-४४, २६ टक्के ४५-६० आणि १४ टक्के प्रकरणं ६० वर्षांपेक्षा अधिक होते, अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.

“करोनाच्या नव्या विषाणूंविरोधातही लस प्रभावी ठरतील”

देशात आता करोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ २.७ लाख राहिली आहे. तसेच यामध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या आठवड्यात देशात करोना विषाणूच्या संक्रमणाचा पॉझिटिव्हिटीचा दर केवळ २.२५ टक्के होता, असेही भूषण यांनी यावेळी सांगितले.