देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटर आणि वाहन कायदा लागू झाला आहे. या नवीन कायद्यानुसार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दंड करण्यात येत आहे. सध्या देशभरामध्ये याच नियमांची चर्चा आहे. कुठे गाडीच्या किंमतीपेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला तर कुठे दोन महिन्यांच्या पगाराइतका दंड ठोठावण्यात आला, अशा अनेक बातम्या मागील आठवडाभरात समोर आल्या आहेत. मात्र या सर्व बातम्यांमधील दंडाच्या रकमेचा विक्रम मोडणारा दंड ओदिशामधील एका ट्रक चालकाला काही दिवसांपूर्वी ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हे प्रकरण ताजे असतनाचा आता एका ट्रक चालकाला जवळजवळ दीड लाखांपर्यंत दंड केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील असलेल्या ट्रक चालकाला दिल्लीमध्ये वाहतूक पोलिसांनी चक्क एक लाख ४१ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला. या ट्रक चालकाने रोहिनी येथील न्यायलयामध्ये दंडाची रक्कम भरुन आपला ट्रक ताब्यात घेतला आहे. ५ सप्टेंबर रोजी क्षमतेपेक्षा अधिक सामान वाहून नेल्याप्रकरणी पोलिसांनी या चालकाला दंड ठोठावला होता. या ट्रक चालकाने भरलेल्या दंडाच्या रकमेची पावती चांगलीच व्हायरल झाली आहे.

दरम्यान या आधीही ३ सप्टेंबर रोजी ओदिशामधील संभलपूर येथे छत्तीसगडला जाणाऱ्या एका ट्रक चालकाला ८६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. नागालँडमधील नोंदणी क्रमांक असणाऱ्या एनएल ०१ जी १४७० या ट्रकचा चालक अशोक जाधव याला हा दंड ठोठावण्यात आला होता. पुरेशी कागदपत्रे नसताना अवजड वाहनाचा चालक म्हणून काम केल्याप्रकरणी पाच हजार रुपये, परवाना नाही म्हणून पाच हजार रुपये, क्षमतेपेक्षा अधिक अवजड सामान वाहून नेत असल्याप्रकरणी ५६ हजार रुपये, ओव्हर डायमेंशन प्रोजेक्शनसाठी (क्षमतेपेक्षा अधिक आकाराचे सामान वाहून नेणे) २० हजार रुपये आणि कागपत्रांसंदर्भातील ५०० रुपये दंड या चालकाला करण्यात आला. या चालकाने तीन दिवसानंतर दंडाची रक्कम आरटीओ कार्यालयात भरल्यानंतर ट्रक त्याच्या ताब्यात देण्यात आला होता. या मोठ्या दंडाची पावतीही सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.