जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्ये झाला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून रहिवासी भागावर गोळीबार करण्यात आला होता. ज्यामध्ये येथील महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला आहे.

पुंछ जिल्ह्यातील कस्बा आणि किरनी सेक्टरमध्ये आज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून नागरी वस्तीवर गोळीबार तसेच उखळी तोफांचा मारा देखील करण्यात आला. भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानला चोख प्रतित्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानकडून वारंवार केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन ही जरी आपल्यासाठी नित्याचीच बाब झालेली असली तरी देखील, सतत इशारा देऊनही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा समोर आलेला आकडा हा थक्क करणारा आहे. पाकिस्तानकडून या वर्षात १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत म्हणजेच कालपर्यंत, तब्बल २ हजार ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर, भारतीय जवानांकडून एलओसीवरील व काश्मीर खोऱ्यातील विविध कारवायांमध्ये १४७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

याबरोबर ही देखील माहिती समोर आली आहे की, काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी जवळपास ५०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडून एलओसीवरील जवानांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक देण्यात आल्याची देखील माहिती आहे. दहशतवाद्यांची एक मोठी टोळी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे.