‘आधार’कडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली: अ‍ॅण्ड्रॉइड भ्रमणध्वनीमध्ये सेव्ह झालेला यूआयडीएआयचा हेल्पलाइन क्रमांक ही गुगलची चूक असल्याचे स्पष्ट झाले तरी त्यामुळे खासगी माहिती चोरी होऊ शकते, अशी भीती युजर्समध्ये होती. मात्र या प्रकाराचा हॅकिंग अथवा डेटाचोरीशी काहीच संबंध नाही, असे आधारकडून ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुगलच्या एका चुकीमुळे आधारचा हेल्पलाइन क्रमांक अनेकांच्या भ्रमणध्वनीमध्ये सेव्ह झाला. याचा फायदा घेत आधारचा विरोध करणारे लोकांच्या मनात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधारच्या हेल्पलाइन क्रमांकामुळे आधार डेटाचोरी होण्याची शक्यता आहे, हा सायबर हल्ला आहे, त्यामुळे हा क्रमांक भ्रमणध्वनीमधून डिलिट करा, असे संदेश फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले जात आहेत.

मात्र त्यामध्ये काहीच तथ्य नाही, आधारचा हा क्रमांक डिलिट करण्याची आवश्यकता नाही, असेही आधारकडून सांगण्यात येत आहे.

भ्रमणध्वनीमध्ये सेव्ह झालेला आधारचा क्रमांक केवळ आधारचा हेल्पलाइन क्रमांक आहे, तो क्रमांक आता जुना झाला आहे. त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, भ्रमणध्वनीच्या संपर्क यादीमध्ये एखादा क्रमांक असल्याने माहितीची चोरी होत नाही, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.