सॉलिसिटर जनरल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यातील गोपनीय पत्रव्यवहार ‘फुटलाच’ कसा, असा सवाल करीत नायब राज्यपाल नजीब जंग हे काँग्रेसचे हस्तक असल्यासारखे वागत आहेत, अशी खरमरीत टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यपालांकडे गेलेली कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांमार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहे. नजीब जंग यांचे हे वर्तन काँग्रसचे हस्तक असल्यासारखेच आहे आणि दिल्लीचे हे नायब राज्यपाल महाशय आम आदमी पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष यांनी केली. नायब राज्यपालांच्या कार्यालयातून झालेल्या ‘वृत्तफुटी’ची ही काही पहिलीच वेळ नाही आणि म्हणूनच या घटनेची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणीही ‘आप’तर्फे करण्यात आली. पत्रकारितेचा पेशा सोडून राजकारणात वळलेल्या आशुतोष यांनी ट्विप्पणीद्वारे अनेक सवाल उपस्थित केल़े  राज्यपालांना पाठविलेले पत्र कसे फुटले, गोपनीय पत्र कार्यालयाबाहेर कधी गेले या साऱ्यांचा तपास व्हायलाच हवा, असे त्यांनी म्हटले आहे. अनेक दिवस मुख्यमंत्री केजरीवाल यांनी नायब राज्यपाल हे ‘संयत व्यक्तिमत्त्व आणि उत्तम माणूस’ असल्याचे म्हटले होते. मात्र या आरोपांमुळे, पक्ष व नायब राज्यपाल यांच्यातील संबंध ताणले जाण्याची चिन्हे आहेत.
केजरीवालांचे खरमरीत पत्र
‘काँग्रेस पक्षाचे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याची ही वेळ नाही. तुम्ही राज्य घटनेशी असलेली बांधिलकी जपायला हवी. हा कसोटीचा क्षण असून सर्व प्रकारच्या दबावांसमोर न झुकता तुम्ही किती ताठ मानेने जगता, याची परीक्षा आहे’, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांना पत्र पाठवले आहे. ‘जर दिल्ली सरकारला एखादे विधेयक मांडण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार असेल तर, राज्य पातळीवर निवडणुकांना अर्थच काय?’, असा सवाल केजरीवाल यांनी केला. तसेच, जनलोकपाल विधेयकाचा मसुदा विधी सचिव, मुख्य सचिव, वित्त सचिव, ज्येष्ठ विधिज्ञ अशा तज्ज्ञांनी तयार केला आहे. तो केंद्राच्या मसुद्याशी विसंगत नाही किंवा त्या विरोधातही नाही’, असा खुलासाही केजरीवालांनी केला.