दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाचा मोदी लाटेत धुव्वा उडाला. त्यामुळे अस्वस्थ झालेले पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा राजकीय डावपेच खेळण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मानहानी प्रकरणात आर्थिक दंड भरून जामीन मिळवण्याऐवजी केजरीवाल यांनी न्यायालयीन कोठडीचा पर्याय निवडला. दोन दिवसांपूर्वी दहा हजार रुपये जातमुचलका भरण्याची तयारी केजरीवाल यांनी दाखवली होती, मात्र बुधवारी ऐन वेळी ही रक्कम भरण्यास नकार दिल्याने महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत २८ जागांवर दणदणीत विजय मिळवून केजरीवाल यांनी काँग्रेसचा सफाया केला होता. त्यानंतर सत्ता स्थापन करून अवघ्या ४९ दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी पळ काढला होता. केजरीवाल यांना आता उपरती झाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच निर्णय चुकीचा होता, अशी कबुली देत केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागितली.
दिल्ली लोकसभेच्या सातही जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. केजरीवाल यांच्या धरसोड वृत्तीचा फटका पक्षाला बसल्याचे पक्षनेत्यांचे मत आहे. केजरीवाल म्हणाले की, राज्यकारभार मध्येच सोडून दिल्याबद्दल दिल्लीकर व देशवासीयांनी मला माफ करावे; परंतु आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते दिल्लीकरांना आपली भूमिका समजावून सांगतील. आपवर विश्वास ठेवण्याची विनंतीही त्यांनी दिल्लीकरांना केली.
मंगळवारी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेत केजरीवाल यांनी विधानसभा विसर्जित करण्याची विनंती केली होती. आम आदमी पक्ष दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी जनतेचे मत आजमावणार असल्याचे केजरीवाल म्हणाले होते. त्यासंबंधी छेडले असता ते म्हणाले की, सध्या तरी सरकार स्थापन करण्याचा आपचा इरादा नाही. आम आदमी पक्षाला पुन्हा पािठबा देणार नसल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. त्यामुळे केजरीवाल यांची पंचाईत झाली आहे. केजरीवाल हे काँग्रेससमर्थक असल्याचा आरोप भाजप सातत्याने करीत आहे. अशा परिस्थिीत पुन्हा काँग्रेसशी हातमिळवणी केल्यास त्याचा फटका बसेल, अशी भीती आपच्या अन्य नेत्यांना आहे.