सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभयसिंह चौटाला यांनीही पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची हरकत नसेल तर मी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन अध्यक्षपद सोडण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कलमाडी यांनीही निवडीनंतर अध्यक्षपद सोडण्याबाबत सांगितले होते.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड केली होती. त्यावर केंद्र सरकारने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ऑलिम्पिक संघटनेच्या या निर्णयावर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले होते. या दोन्ही नेत्यांची निवड रद्द होत नाही, तोपर्यंत सरकारतर्फे ऑलिम्पिक संघटनेला कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असेही गोयल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. गोयल यांच्या पवित्र्यानंतर सुरेश कलमाडी यांनी आजीवन अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत आपली निवड योग्य असल्याचे अभयसिंह चौटाला यांनी सांगितले होते.

चौटाला यांनी गुरुवारी मात्र, या निर्णयाबाबतचा चेंडू आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे टोलवला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची हरकत नसेल तर मी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन अध्यक्षपद सोडण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. चौटाला अध्यक्षपद सोडण्यास सहजासहजी तयार नाहीत, असे या त्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. त्यांच्या निवडीवर प्रसारमाध्यमे आणि सरकारने आक्षेप नोंदवल्यानंतर माझ्यामुळे भारतीय खेळाडू पदके जिंकत असल्याचा दावा चौटाला यांनी केला होता. माझ्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल नसून, ते राजकीय गुन्हे दाखल आहेत, असेही ते म्हणाले होते. अभय चौटाला हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे चिरंजीव असून, उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.