शहरांची नावे बदलाचे वारे सध्या देशभरात वाहत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद आणि फैजाबाद शहरांची नावे बदलली आहेत. आता आझमगडचे नाव आर्यगड करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांनी आपला संताप व्यक्त केला. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्याच्या नादात त्यांची जीभ घसरली. आझमगड हे आझम शाहसाहेबांनी वसवले होते. योगी आदित्यनाथांच्या बापाने वसवले नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.
वर्ष २०१९ मध्ये मोदींना गुजरातमध्ये पुन्हा जावे लागणार आहे. धोबी का कुत्ता न घर का होता है न घाट का, अशी त्यांची अवस्था होणार आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
नुकताच अलाहाबादचे नामांतर प्रयागराज असे करण्यात आले आहे. त्यानंतर फैजाबादचे नाव बदलून ते अयोध्या करण्यात आले. आणखी काही शहरांची नावे बदलण्याची सरकारची तयारी सुरु आहे. याबाबत भाजपा आमदार संगीत सोम म्हणाले की, पुढे अनेक शहरांची नावे बदलली जाणार आहेत. मुझफ्फरनगरचे नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची जनतेची आधीपासूनच मागणी आहे. मुझफ्फरनगर हे नाव नवाब मुझफ्फर अलीच्या नावावर ठेवण्यात आले होते.
शहरांचे नावे बदलण्याचा विविध पक्षांकडून विरोध सुरुच आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपावर टीका केली. भाजपाला भारताचा गौरव समजत नाही आणि त्यांना त्याची ओळखही नाही. त्याचबरोबर त्यांना भारताचे चरित्रही समजत नाही अन् त्याची परिभाषाही, असा टोला त्यांनी लगावला.
सिंघवी म्हणाले, आज मी ५०० वर्षांचा इतिहास बदलला. उद्या तुम्ही येणार आणि मागील ५०० वर्षांचा इतिहास बदलणार. शेवटी तिसरा कोणीतरी येणार आणि मागील हजार वर्षांचा इतिहास बदलणार. नाव बदलण्यापेक्षा देशाचा जीडीपी वाढावा आणि युवकांना रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष द्या.