दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) बाजी मारली आहे. अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदावर एबीव्हीपीने विजय मिळवला आहे. तर नॅशनल स्टुडंट्स युनिअन ऑफ इंडियाने (एनएसयुआय) सचिवपदावर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अभाविपचा ३-१ असा विजय झाला आहे. अभाविप ही आरएसएसशी, एनएसयुआय ही काँग्रेसशी तर आयसा ही डाव्यांशी संबंधीत विद्यार्थी संघटना आहे.

आज सकाळपासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, दुपारी ३.३० वाजता मतमोजणी संपली त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये अभाविपचा अक्षित दहिया या विद्यार्थ्याची अध्यक्षपदी, प्रदीप तंवरची उपाध्यपदी तर शिवांगी खरवाल ही ची संयुक्त सचिवपदी निवड झाली तर एनएसयुआयच्या आशिष लांबा सचिवपदी निवडून आला.

विद्यार्थी संघटना एनएसयुआय, अभाविप आणि आयसा यांमध्ये ही तिरंगी लढत झाली. यामध्ये एकूण ३९.९० टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात ४० टक्के मतदान झाले, जे मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात महाविद्यालयांमध्ये रात्री ७.३० वाजता मतदान संपले. रात्री उशीरापर्यंत संध्याकाळच्या सत्रातील मतदानाची टक्केवारी घोषित करण्यात आली नव्हती.

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीसाठी एकूण ५२ महाविद्यालये आणि विभागांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. दिल्ली विद्यापीठाच्या एकूण मतदानाच्या आकडेवरीनुसार, यंदाच्या मतदानात घट झाली आहे.