कोविड-१९ लशींच्या परिणामकारकतेबाबत अफवा पसरवल्या जात असल्याच्या समस्येला तोंड देणाऱ्या केंद्र सरकारने राज्यांना अशा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास सांगितले असून, अशा प्रकारे चुकीची व अपुरी माहिती पसरवणाऱ्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रतिकारक्षम असल्याचे राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला आढळले आहे, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात आवर्जून नमूद केले आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाशी समन्वय साधून १६ जानेवारीपासून या दोन लशींसह देशभरात कोविड-१९ लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.

कोविड-१९ लशीबाबतच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने (एनईजीव्हीएसी) ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार आरोग्य कर्मचारी व करोनायोद्धे यांचे लसीकरण केले जात असून, त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या प्राधान्य गटातील लोकांना लस दिली जाईल, असे भल्ला यांनी सांगितले.

सुरक्षिततेची ग्वाही

‘देशात उत्पादित लसी सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तथापि समाजमाध्यमांवर त्यांच्याबाबत निराधार व दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे त्यांची सुरक्षितता व परिणामकारकता याबाबत संभ्रम निर्माम होत आहे. हितसंबंधी लोकांमार्फत पसरवल्या जाणाऱ्या अशा अफवांमुळे लोकांमध्ये अनावश्यक शंका पसरू शकतात. त्यामुळे या अफवांना आळा घालण्याची आवश्यकता आहे’, असे भल्ला यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

देशात करोना मृत्यूंत घट

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सोमवारी १३१ इतकी नोंदली गेली असून दैनंदिन मृत्यूंच्या नोंदीचा आठ महिन्यांतील हा सर्वात कमी आकडा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. १७ मे पासूनची ही सर्वात कमी मृत्यूसंख्या असून त्या दिवशी मृतांची संख्या ही १२० होती. एकूण रुग्णांची संख्या आता १,०६,६७,७३६ झाली असून १३,२०३ नवीन रुग्ण सापडले आहेत. १,८४,१८२ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण संसर्गाच्या १.७३ टक्के आहे. लागोपाठ सहाव्या दिवशी हे प्रमाण दोन लाखांच्या खाली राहिले आहे. आतापर्यंत १,०३,३०,०८४ लोक बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता ९६.८३ टक्के आहे. मृत्यू दर १.४ टक्के झाला असून १३१ नवीन मृतात महाराष्ट्रात  ४५, केरळात २०, दिल्लीत ९, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ८ या प्रमाणे रुग्णांचे प्रमाण आहे. देशात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ४७० जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्र ५०,७८५, तमिळनाडू १२,३१६, कर्नाटक १२,१९७, दिल्ली १०,८०८, पश्चिम बंगाल १०,११५, उत्तर प्रदेश ८,६१७, आंध्र प्रदेश ७,१४७ असे प्रमाण आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार १९.२३ कोटी जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून रविवारी ५ लाख ७० हजार २४६ चाचण्या करण्यात आल्या. एकूण मृत्यूंमध्ये सह आजाराने मरण पावलेल्यांचे प्रमाण सत्तर टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

झायडस कॅडिलाच्या औषध चाचण्या यशस्वी

नवी दिल्ली : झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या डेसिडय़ुस्टॅट या कोविड विषाणूवरील औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. मेक्सिकोत या चाचण्या करण्यात आल्या असून त्याच्या दोन टप्प्यातील चाचण्यांची पूर्तता झाल्याचे सांगण्यात येते. जून २०२० मध्ये झायडस कॅडिलाच्या औषधाला मेक्सिकोतील कोफेप्रिस या औषध नियामक प्राधिकरणाने चाचण्यांना परवानगी दिली होती. त्यातील दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासाचे निष्कर्ष हाती आले आहेत. झायडस कॅडीला ही कॅडिला हेल्थकेअर समूहातील कंपनी असून कंपनीने म्हटले आहे, की काही कोविड रुग्णात ‘हायपोक्सिया’ने अवयव विकलांग होण्याच्या व मृत्यूच्या घटना विषाणूरोधक औषधे देऊनही घडत होत्या. नवीन औषधाच्या चाचण्यात हे विपरीत परिणाम रोखण्यात यश आले असून त्यात रुग्णाला व्हेन्टिलेटरवरही ठेवण्याची वेळ येणार नाही. नवीन औषधाने तांबडय़ा रक्तपेशी वाढून उतींमधील ऑक्सिजनची पातळीही वाढते. यात रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तींना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली नाही. इतर औषधे घेत असलेल्या रुग्णात  २५ टक्के लोकांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली.