अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या खुशबू सुंदर यांनी नुकतंच काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच खुशबू सुंदर यांच्यावर माफी मागण्याची वेळ आली. भाजपामध्ये प्रवेश करताना खुशबू सुंदर यांनी काँग्रेसवर टीका करताना मानसिक संतुलन ढासळलेल्यांचा पक्ष असल्याचं म्हटलं होतं. आपल्या या वक्तव्यावरुन खुशबू सुंदर यांनी माफी मागितली आहे. अयोग्य शब्दांचा वापर केल्याप्रकरणी त्यांनी फक्त माफी मागितलेली नसून भविष्यात पुन्हा असं होणार नाही अशी हमी दिली आहे.

खुशबू सुंदर यांच्या वक्तव्याविरोधात तामिळनाडूमधील जवळपास ३० पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. खुशबू सुंदर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चेन्नईमध्ये त्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस पक्ष सोडल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर देताना खुशबू यांनी म्हटलं होतं की, “मी काँग्रेसमध्ये मागील सहा वर्षांपासून होतो. मी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मी पक्ष सोडल्यानंतर मला तो मानसिक संतुलन बिघडलेल्यांचा पक्ष होता असं मला जाणवलं”.

खुशबू सुंदर यांनी माफी मागणारं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी आपण घाईत आपल्याकडून वापरण्यात आलेल्या शब्दांबद्दल माफी मागितली आहे. आपण वापरलेले शब्द चुकीचे असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्य तसंच मित्रही मानसिक तणावाशी झगडत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. यापुढे कोणत्याही कारणास्तव पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये याची आपण खात्री बाळगू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे.

खुशबू यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिव्यांगांसाठी काम करणाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या दिपकनाथन यांनी काँग्रेसवर टीका करताना खुशबू यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. “काँग्रेसवर टीका करताना दिव्यांगांशी तुलना करणे चुकीचे आहे. तुम्ही त्यांची तुलना का करता? ते ही तुमच्यासारखेच नाहीत का?,” असा सवाल दिपकनाथन यांनी उपस्थित केला होता. खुशबू सुंदर यांनी मानसिक आजार असणाऱ्यांना महत्व दिलं जावं आणि त्यांचा आवाज ऐकला जावा असं सांगताना आपणही त्यासाठी समर्पित आहोत असं म्हटलं आहे.