अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी होत असला, तरी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण दिले जाणार का, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

अडवाणींना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. दूरध्वनीवरूनही ट्रस्टच्या वतीने अडवाणी यांच्याशी अद्याप संपर्क साधण्यात आलेला नाही, अशी माहिती अडवाणी यांच्या निकटवर्तीयांनी शनिवारी संध्याकाळी दिली.

भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र निमंत्रितांची अंतिम यादी अजून तयार झालेली नाही, असे ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी स्पष्ट केले. सुरक्षेच्या कारणास्तव निमंत्रण यादीवर पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगितले जाते.

निमंत्रण यादी तयार करण्याची जबाबदारी निवडक विश्वस्तांकडे सोपवण्यात आली आहे. ट्रस्टने अडवाणींना अधिकृतपणे निमंत्रणही पाठवले आहे; पण ते भूमिपूजनाला येणार आहेत का हे माहिती नाही, असे संबंधित विश्वस्ताने सांगितले.

भूमिपूजनाला २०० मान्यवरांना आमंत्रण दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोहळ्याला उपस्थित राहणार असून सरसंघचालक मोहन भागवत, तसेच संघाचे वरिष्ठ पदाधिकारीही निमंत्रित असतील. ट्रस्टच्या वतीने प्रामुख्याने संत-महंत, तसेच घटनात्मक व वैधानिक पदावरील काही व्यक्तींना निमंत्रण असेल. ट्रस्टने राजकीय व्यक्तींना निमंत्रण पाठवलेले नाही. अडवाणी, मुरलीमनोहर जोशी व उमा भारती यांचा अपवाद केला जाईल, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली.

झाले काय?

राम मंदिर उभारणीच्या मोहिमेत सुरुवातीपासून सहभागी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी व उमा भारती यांना ट्रस्टकडून आमंत्रण दिले जाईल, असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. भूमिपूजनासाठी फक्त चार दिवस उरले असतानाही अडवाणी यांना अधिकृतपणे आमंत्रण न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘पाठवले असेल तर मिळेल..’  यासंदर्भात अडवाणी यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्हाला निमंत्रण मिळालेले नाही. तुम्हाला ट्रस्टच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण अडवाणींना राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळालेले नाही. त्यांनी पाठवले असेल तर मिळेल.