करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील दररोज साडेचार लाखांच्या आसपास असलेली रुग्ण संख्येत आता मोठी घट झाली आहे. महिन्याभरात ही संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही २६ लाखांच्या खाली आहे. देशातील मृतांची दररोजची सरासरी देखील खाली येताना दिसत असून, एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे तीन हजार ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे सोमवारी मृत पावलेल्या रुग्णांच्या प्रमाणात ही आकडेवारी कमी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत एक लाख ९६ हजार ४२७ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख २६ हजार ८५० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन हजार ५११ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख ७ हजार २३१ वर पोहोचली आहे.

 

गेल्या २४ तासांत सर्वाधिक महाराष्ट्रातही रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र करोनाबळींची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२.५१ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. तर मागच्या २४ तासात २२ हजार १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे.

देशात सध्या २५ लाख ८६ हजार ७८२ रुग्ण हे उपचाराधीन आहेत. ३ लाख ७ हजार २३१ जणांचा करोनामुळे जीव गेला आहे. देशात एकूण २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४ जणांना करोनाची लागण झाली आहे तर २ कोटी ४० लाख ५४ हजार ८६१ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहे.