अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका केल्यानंतर पुन्हा एकदा योगगुरु रामदेव यांनी घुमजाव केलं आहे. आता करोनावरील लस घेणार असल्याचं योगगुरू रामदेव यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव यांनी सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच योग करोनापासून होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करत असल्याचं देखील सांगायला विसरले नाहीत. तर योग आणि आयुर्वेदचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाईल अशी घोषणा केली आहे. त्यानंतर योगगुरु यांनी लस घेण्याचं आवाहन केल्यानं सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत.

‘डॉक्टर पृथ्वीवरील देवदूत’

औषध माफियांवर योगगुरु रामदेव यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. “आमचं संघटनेसोबत कोणतही शत्रूत्व नाही. सर्व चांगले डॉक्टर देवाने पृथ्वीवर पाठवलेले देवदूत आहेत. आमची लढाई डॉक्टरांसोबत नाही. जे डॉक्टर आमचा विरोध करताहेत. ते कोणत्याही संस्थेद्वारे करत नाही”, असं त्यांनी यावेळी सांगितलं. “औषधांच्या नावाखाली कुणाला त्रास देऊ नका. लोकांनी अनावश्यक औषधांपासून स्वत:चा बचाव केला पाहीजे. अ‍ॅलोपॅथी आपतकालीन आजारांमध्ये आणि सर्जरीसाठी चांगली आहे. पंतप्रधानांना जनऔषधी दुकानं सुरु करावी लागली. कारण औषध माफियांकडून फॅन्सी दुकानं थाटली गेली आहेत. तिथे अनावश्यक औषधं जास्त किंमतींना विकली जात आहेत”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

लसींची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकार करणार घासाघीस

योगगुरु रामदेव आणि आयएमए वाद

योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. करोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांची वादग्रस्त वक्तव्य थांबली नाहीत. गेल्या काही दिवसात योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्याऐवजी वाढत असल्याचं दिसत आहे. अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.