तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ’ब्रायन यांनी नोटाबंदी हा एक ‘फ्लॉप शो’ असल्याची टीका केली आहे. त्यांनी याची तुलना इंदिरा गांधींनी राबवलेल्या ‘नसबंदी’ अभियानाशी केली. १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी लागू केलेल्या नसबंदीमुळे त्यांचा दारूण पराभव झाला होता. अगदी त्याचपद्धतीने भाजप २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नोटबंदी अपयशी ठरल्याचे तृणमूल काँग्रेसने सुरूवातीलाच म्हटले होते, असे ‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने लोकांना वेड्यात काढल्याचा आरोप केला. नोटाबंदीने देशातील सामान्य जनता त्रस्त झाली. याचीच किंमत भाजपला पुढील निवडणुकीत फेडावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, नोटाबंदीबाबत माहिती देताना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अर्थव्यवस्थेतून बाद करण्यात आलेल्या एकूण चलनापैकी १५.२८ लाख कोटी इतक्या रकमेचे चलन रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्याचे सांगितले आहे. म्हणजे ९९ टक्के जुन्या नोटा बँकामध्ये परत आल्या. केवळ १००० रूपयांच्या ८.९ कोटी  नोटा बँकांमध्ये परत आल्या नाहीत. बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे.

आरबीआयच्या अहवालानुसार, मागील वर्षी अर्थव्यवस्थेतून बाद केलेल्या १००० रूपयांच्या एकूण ८.९ कोटी नोटा ज्याचे मूल्य ८९०० कोटी इतके होते. ते परत आलेच नाहीत. त्यावेळी चलनात १००० रूपयांच्या ६७० कोटी नोटा होत्या. बंदी घालण्यात आलेल्या १००० रूपयांच्या ज्या नोटा परत आलेल्या नाहीत. त्या वर्ष २०१६च्या ८ नोव्हेंबरपूर्वी चलनात राहिलेल्या एकूण नोटांच्या अवघ्या १.३ टक्के इतके आहे. नोटाबंदीची घोषणा केलेल्या दिवशी चलनात एकूण १७.९७ लाख कोटी नोटा होत्या. यामध्ये ८६ टक्के म्हणजेच १५.४४ लाख कोटी नोटा ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात होते. त्यांना अवैध घोषित करण्यात आले.

आरबीआयने बंदी घातलेल्या ५०० रूपयांच्या किती नोटा परत आल्यात याची आकडेवारी दिलेली नाही. एका अहवालानुसार मागील वर्षी एकूण ७,६२,९२६ बनावट नोटा सापडल्या. तर आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान एकूण ६,३२,९२६ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.