राजधानी दिल्लीत ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे आणखी एका २२ वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने  वार केल्याची घटना दक्षिण दिल्लीतील मेहराऊली भागात घडली. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भारतीय नागरिकांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच असून गेल्या आठवडय़ात एका १४ वर्षी मुलीवरही बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मंगळवारी अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव कुप्सीक्रेन असे नाव आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास कामावरून घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्याला रस्त्यात गाठले आणि त्याचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध केल्यामुळे चोरटय़ांनी त्याच्या पोटात चाकू मारला. लुटमारीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी रात्री अांबेडकर नगर मध्ये दोन मणिपूरी तरुणांना मोठय़ा प्रमाणात मारहाण करण्यात आली होती.

हल्ल्यांबाबत लोकसभेत चिंता
राजधानी दिल्लीत ईशान्य भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत मंगळवारी लोकसभेतही चिंता  व्यक्त करण्यात आली. तसेच सरकारने याप्रकरणी ठोस कारवाई करून ईशान्य भारतीय नागरिकांना सुरक्षेची हमी द्यावी,अशी मागणी सदस्यांनी केली.