17 December 2017

News Flash

अफझल गुरूला अखेर फाशी

भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च पीठ असलेल्या संसदेवर २००१ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 10, 2013 3:09 AM

अत्यंत गुप्ततेने सरकारी यंत्रणांची कार्यवाही, तिहार तुरुंगातच दफनविधी
* ज्या गुप्ततेने भारताने अफझल गुरु यास फाशी दिली त्याचा आम्ही निषेध करतो. – अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल
* काश्मीरमध्ये  हिंसाचाराच्या घटनांमध्ये २३ पोलिस अधिकाऱ्यांसह ३६ जण जखमी
भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च पीठ असलेल्या संसदेवर २००१ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याला शनिवारी सकाळी आठ वाजता तिहार तुरुंगात फाशी देऊन तिथेच त्याचे दफन करण्यात आले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याप्रमाणेच अफजलच्या शिक्षेची कार्यवाही अत्यंत गुप्तपणे अमलात आणण्यात आली. त्याची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सहा दिवसांपूर्वी म्हणजे ३ फेब्रुवारीला फेटाळली होती.
संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे नऊ जवान धारातीर्थी पडले होते. या हल्ल्याला दहा वर्षे उलटून गेल्यानंतर अफजलला फाशी देण्यात आली आहे. तरी सरकारने उचललेले पाऊल हे स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया प्रमुख राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे.
अफजल गुरू हा ४३ वर्षांचा अतिरेकी उत्तर काश्मीरमधील सोपोर गावचा होता. तो मूळचा फळविक्रेता होता. डिसेंबर २००२ मध्ये अफजल गुरू याला अतिरेक्यांना हल्ल्यात मदत करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २००५ रोजी शिक्कामोर्तब केले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा वाढवली असून, बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पोलीस महासंचालक अशोक प्रसाद व इतर वरिष्ठ अधिकारी तातडीने जम्मू येथून सकाळीच श्रीनगरकडे रवाना झाले. तेथील कायदा-सुव्यवस्था स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
गुरूची दयेची याचिका फेटाळल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना सरकारने दिली होती. स्पीड पोस्टने त्यांना ही माहिती कळवल्याचे केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी सांगितले. हुर्रियतच्या मिरवेझ उमर फारूख यांच्या गटाने चार दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, या काळात सर्व व्यवहार बंद ठेवले जातील, असे या संघटनेचे प्रवक्ते शहीद उल इस्लाम यांनी सांगितले.

फाशी दिलेला दुसरा काश्मिरी अतिरेकी
जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचा नेता मकबूल बट याला ११ फेब्रुवारी १९८४ रोजी फाशी देण्यात आले होते. ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक अधिकारी रवींद्र म्हात्रे यांच्या हत्येनंतर भारतातील तुरुंगात असलेल्या मकबूल बट याला फाशी देण्यात आले होते. फाशीची शिक्षा झालेला तो पहिला काश्मिरी अतिरेकी ठरला होता. त्यानंतर अफजल गुरू हा फाशी देण्यात आलेला दुसरा काश्मिरी अतिरेकी आहे.

अफजलला श्रीनगरमध्ये पकडले होते..
अफजल गुरू याला दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक एस.ए.आर. गिलानी व शौकत हुसेन यांच्यासह फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. हुसेनची पत्नी अफसान हिची मात्र मुक्तता झाली होती. गिलानी याला उच्च न्यायालयाने २००३मध्ये सोडून दिले व गुरू, हुसेन यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुरूची फाशीची शिक्षा २००५मध्ये कायम केली व हुसेन याला फाशीऐवजी १०वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली. १३ डिसेंबर २००१ रोजी पाच सशस्त्र बंदूकधारी अतिरेकी संसद संकुलात घुसले होते व त्यांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला अधिकाऱ्यासह दिल्ली पोलिसांचे पाच जवान धारातीर्थी पडले होते. या हल्ल्यात एक पत्रकार जखमी झाला होता. त्याचे नंतर निधन झाले. सर्व पाचही अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केले होते. अफजल गुरू याला या हल्ल्यानंतर दिल्लीहून श्रीनगरला एका ट्रकमधून जात असताना अटक करण्यात आली होती.

अफझलला फाशी ८ वाजताच का ?
कसाब आणि गुरु या दोघांनाही फाशी सकाळीच का दिली गेली? तुरुंगासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूत्रांमध्ये, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ही दिवस पूर्ण उजाडण्यापूर्वीच करावी असे नमूद केले आहे. पंजाब-हरीयाणा तुरुंग नियमावलीनुसार, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत फाशीची शिक्षा ८ वाजता देणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात हीच वेळ साडे सात असल्याने कसाबला सकाळी साडे सात वाजता तर अफझलला सकाळी ८ वाजता फाशी देण्यात आली.

अखेरच्या क्षणीही निर्विकार
अफझल गुरू याला त्याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबद्दल शुक्रवारी सायंकाळी कल्पना देण्यात आल्याचे तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तत्पूर्वी गुरुवारी सकाळी अफझल गुरू याचे वजन करण्यात आले. बिहारमधील बक्सार येथे खास फाशीसाठी तयार करण्यात आलेल्या दोरखंडाची चाचणी करण्यासाठी हे वजन करण्यात आले होते. शुक्रवारी गुरूचे पुन्हा एकदा वजन करण्यात आले.
अफझलची नियमितपणे वैद्यकीय तपासणी होत होती, त्यामुळे त्याला या वजन करण्यावरून कोणताही अंदाज बांधता येऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळपासून अफझलभोवती असलेले अन्य प्रमुख कैदी हटविण्यात आले तसेच त्याच्या तुरुंगाभोवती सुरू असलेले बांधकामही थांबविण्यात आले. त्यानंतर त्याला फाशीच्या शिक्षेबद्दल कल्पना देण्यात आली. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी त्याची मानसिक तसेच शारीरिक तपासणी करण्यात आली. त्याची नाडी, हृदयाचे ठोके स्थिर होते. अस्वस्थतेचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते, असे तपासणी करणाऱ्यांनी सांगितले.

अफझलच्या कुटुंबीयांची तक्रार
अफझल गुरूला फाशी दिल्याची बातमी ही त्याची पत्नी तबस्सुम, मुलगा गालिब, सासरे बुहरू व बंधू गुरू यांच्यासाठी धक्कादायक होती. ही फेसबुकवरची अफवा आहे असे सुरुवातीला त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी सांगितले.
पण ती अफवा नव्हती तिहार तुरुंगात खरोखर अफजलला फाशी देण्यात
आले होते. सर्व आशा मावळल्या होत्या. नंतर अर्धा तासातच बातमी खरी असल्याचे वृत्तवाहिन्यांवरून समजले. अफजलला शनिवारी सकाळी फाशी देण्यात येणार आहे याबाबत आम्हाला अंधारात ठेवले अशी त्याच्या नातेवाइकांची तक्रार होती.

First Published on February 10, 2013 3:09 am

Web Title: afzal guru hanged at the last