मी एक साधाभोळा माणूस आहे.  इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरु होता असे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी त्यांनी पाटणा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात ऐश्वर्या आणि तेज प्रतापचा संसार मो़डला.

तेज प्रताप राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे थोरले सुपूत्र आहेत. घटस्फोटाची याचिका मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून येत्या २९ नोव्हेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. लालू प्रसाद यादव यांना भेटण्यासाठी रांची येथे निघालेले तेज प्रताप बोधगया येथे थांबले होते. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी घटस्फोट घेण्याची वेळ का आली ? त्याबद्दल खुलासा केला.

मला लग्न करायचं नव्हतं हे मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणी माझं ऐकल नाही. आमच्या दोघांची मन जुळत नाहीत. आमचे स्वभाव भिन्न आहेत. माझ्या साध्या सवयी असून मी एक साधाभोळा माणूस आहे तर ऐश्वर्या आधुनिक विचारांची मुलगी आहे. दिल्लीमध्ये तिचे शिक्षण झाले. तिला शहरी आयुष्य जगण्याची सवय आहे असे तेज प्रताप म्हणाला.

मागच्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि माझ्यामध्ये संवाद नाहीय असे तेज प्रतापने सांगितले. वृद्धावन येथून परतल्यानंतर तेज प्रतापने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. पाटणा येथील मोठया मैदानात तेज प्रताप-ऐश्वर्याचा हायप्रोफाईल विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला होता. जवळपास १० हजार लोक या लग्नाला आले होते.

ऐश्वर्या राय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे. ऐश्वर्या सुद्धा राजकीय कुटुंबातून असून २०१९ लोकसभा निवडणुकीत ऐश्वर्याला सारण लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाईल अशी चर्चा होती. ऐश्वर्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी आहे. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे सुपूत्र आहेत. दरोगा बिहारचे १० वे मुख्यमंत्री होते. १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले.