नागरिकता दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मणिपुरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते अरिबाम श्याम शर्मा यांनी आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला आहे. २००६ मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील विशेष सहभागाबद्दल पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. नागरिकता विधेयकाला त्यांनी कडाडून विरोध केला आहे.


मणिपुरची राजधानी इंफाळ येथे त्यांनी रविवारी ही घोषणा केली. त्याचबरोबर मणिपुरमधील काही सामाजिक संघटनांनीही या वादग्रस्त विधेयकाचा निषेध नोंदवला आहे. या विधेयकामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या अल्पसंख्यांकांना (हिंदू, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, पारसी आणि शीख) भारतीय नागरिकत्व देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी लोकसभेत या विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे.

या विधेयकात दुरुस्तीला मंजुरी देण्यात आल्याने मणिपुरमधील स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्यासाठी स्थानिकांकडून मणिपूरमध्ये छोटी-मोठी आंदोलने करण्यात येत आहेत. यालाच ८३ वर्षीय चित्रपट निर्माते आणि संगीत संयोजक अरिबाम यांनीही विरोध दर्शवला आहे. अरिबाम हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत, त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे. ७० दशकांत मणिपुरी सिनेमामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे.