आग्रा येथील रुग्णालयाची चौकशी
आग्रा : करोना रुग्णांना करण्यात येणारा प्राणवायूचा पुरवठा पाच मिनिटांसाठी खंडित करून आपण मॉक ड्रिल केले, असे एका खासगी रुग्णालयाचा मालक सांगत असल्याची फीत व्हायरल झाल्यानंतर आग्रा प्रशासनाने मंगळवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राणवायुचा पुरवठी खंडित करण्यात आल्यानंतर काही रुग्णांच्या मतदेहांचा रंग निळा होऊ लागल्याचेही श्री पारस रुग्णालयाचा मालक सांगत असल्याची फीत समाजमध्यमांवर सोमवारी व्हायरल झाली होती. या मालकाविरुद्ध साथरोग कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी प्रभू एन. सिंह यांनी वार्ताहरांना सांगितले. हे रुग्णालय सील करण्यात येणार असून तेथील रुग्णांना अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी रुग्णालयात प्राणवायुचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा असल्याचा दावा २८ एप्रिल रोजी डॉ. अरिंजय जैन यांनी एका व्हिडीओमध्ये केला होता. प्राणवायू कोठेही उपलब्ध नाही, मुख्यमंत्रीही तुम्हाला प्राणवायू देऊ शकत नाही, मोदीनगर कोरडे पडले आहे, असे हा डॉक्टर म्हणत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा नव्हता आणि प्राणवयूच्या तुटवडय़ामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. श्री पारस रुग्णालयात पुरेसा प्राणवायू होता, २२ रुग्णांचा मृत्यू प्राणावायूच्या तुटवडय़ामुळे झाला हे सत्य नाही तथापि, व्हिडीओ तपासून पाहिला जाईल आणि कारवाई केली जाईल, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी रुग्णालयात एक पथक पाठविण्यात आले असल्याचे आग्रा येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. सी. पांडे यांनी सांगितले.