अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही तास उरले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. सध्या तरी या निवडणुकीचे पारडे कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही. ट्रम्प यांच्या विजयासाठी दिल्लीतील त्यांच्या समर्थकांनी विशेष प्रार्थना केली.

मंगळवारी दिल्लीतील मंदिरात हिंदू सेनेचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी विशेष पूजा आयोजित केली होती. पूजाऱ्याच्या उपस्थितीत पूर्व दिल्लीतील मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली. हिंदू सेनेने हिंदू विधीनुसार ३० मिनिट विशेष पूजाअर्चा केली. यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची कामना करण्यात आली. ट्रम्प यांच्या विजयासाठी विशेष मंत्रपठण आणि होम हवन करण्यात आले.

“डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामिक कट्टरपंथीयांबद्दल नेहमीच कणखर भूमिका घेतली आहे. आता जगाने अमेरिकेमधल्या निवडणुकीसाठी त्यांच्या पाठिमागे उभे राहिले पाहिजे” असे ही पूजा करणारे पुजारी वेद शास्त्री इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- कमला हॅरिस आगे बढो… तामिळनाडूमधील ‘या’ गावात लागले पोस्टर्स

“मागच्या निवडणुकीतही ट्रम्प यांच्या विजयासाठी आम्ही आशिर्वाद मागितला होता. यावेळी सुद्धा आम्ही त्यांच्या विजयासाठी आशिर्वाद मागत आहोत. त्यांचा विजय फक्त जगाचा विजय नसेल तर चीन-पाकिस्तान विरोधात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील” असे हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता म्हणाले.