स्वयंघोषित संत आसाराम बापू यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे. गुजरातमध्ये त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आसाराम बापू यांची गुजरात पोलीसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गांधीनगरमधील न्यायालयाने आसाराम बापूंविरोधात वॉरंट जारी केले असून, लवकरच गुजरात पोलीसांचे पथक जोधपूरमध्ये जाऊन तेथील तुरुंगातून आसाराम बापूंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. 
पोलीसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यांना आसाराम बापूंविरोधा पुरावे सापडले आहेत. आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. त्यासाठीच आम्ही न्यायालयाकडून वॉरंट घेतले असल्याचे पोलीस सहआयुक्त जे. के. भट यांनी पत्रकारांना सांगितले.
कोणत्याही क्षणी गुजरात पोलीसांचे पथक जोधपूरमध्ये जाऊन आसाराम बापूंना ताब्यात घेईल आणि त्यांना गांधीनगरमधील न्यायालयात हजर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. आसाराम बापूंविरोधात गुजरातमधील दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप सुरत पोलीसांकडे केला होता. हा गुन्हा नंतर अहमदाबादमधील चांदखेडा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला होता.