बिहार विधानसभा निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने लक्ष वेधून घेणारं यश मिळवलं. बिहारमध्ये एमआयएम आणि मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने केलेल्या राजकीय प्रयोगाला बिहारमध्ये यश येताना दिसलं. प्रयोगामुळे एमआयएमच्या आशा प्रफुल्लित झाल्या असून, आता हाच प्रयोग उत्तर प्रदेशात करण्याची तयारी ओवेसींकडून सुरू झाली आहे.

बिहारनंतर उत्तर प्रदेशात करिश्मा दाखवण्यासाठी एमआयएम भाजपाविरोधात रणनीती आखण्याची तयारी करत आहे. उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक एमआयएम-बहुजन समाज पक्ष आघाडी करून लढण्याची दाट शक्यता आहे. त्यातच एमआयएमकडून निवडणुकीची जोरात तयारी सुरू असून, मागील महिन्यात २० जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशात २०२२मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, एमआयएम व बसपाने त्याची मोर्चबांधणी आतापासूनच सुरू केली असल्याचं दिसत आहे. या निवडणुकींना मोठा अवधी बाकी असताना एमआयएमकडून बहुजन समाज पक्षाकडे राजकीय मैत्री करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एमआयएमचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली याविषयी बोलताना म्हणाले,”उत्तर प्रदेशात ओवेसी व मायावती एकत्र येऊन सांप्रदायिक शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखू शकतात. समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेस यापैकी कुणीही एकटं भाजपाला रोखू शकत नाही.”

“उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांच्या समस्या एकसारख्याच आहेत. त्याचबरोबर दोन्ही लोकसंख्याही सारखीच आहे. आम्ही मागच्या निवडणुकीतही बसपासोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यावेळी आघाडी होऊ शकली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत एक राजकीय प्रयोग झाला आहे आणि तो यशस्वीही ठरला आहे. आता उत्तर प्रदेशात तो करायला हवा,” असं म्हणत त्यांनी बसपासोबत आघाडीचे संकेत दिले आहेत.