नवी दिल्ली : वैमानिकांना मिळणारा उड्डाण भत्ता द्यावा, अन्यथा विमानांचे उड्डाण होणार नाही, असा इशारा एअर इंडियाच्या वैमानिकांनी कंपनीला दिला आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांना जुलै महिन्याचे मूळ वेतन मिळाले असले तरी उड्डाण भत्ता देण्यात आलेला नाही, त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे.

इंडियन कमर्शिअल पायलट्स असोसिएशनने (आयसीपीए) या बाबत एक पत्र पाठविले असून त्यामध्ये इशारा देण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार १४ ऑगस्टला मिळाला, मात्र पगारातील मोठा हिस्सा असलेला उड्डाण भत्ता देण्यात आलेला नाही. यापूर्वीही पगार उशिराने मिळत असल्याबाबत त्याचप्रमाणे उड्डाण भत्त्याचा पगारामध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. उड्डाण भत्ता मिळाला नाही तर काम करणार नाही, असे वैमानिकांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पाठविण्यात आलेल्या पत्रात, आमच्या पत्राबाबत व्यवस्थापन सकारात्मक विचार करील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सकारात्मक विचार करण्यात आला नाही तर वैमानिक काम करणार नाहीत आणि त्याच्या गंभीर परिणामांना व्यवस्थापन जबाबदार असेल, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.