भारतातील हवेत प्रदूषणाचे घटक दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हवेतील या वाढत्या प्रदूषणामुळे फक्त ह्दय आणि फुफ्फुस खराब होत नसून माणसाच्या मेंदूवरही याचा परिणाम होतोय. याले आणि पीकिंग विद्यापीठाच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. खासकरुन वयस्कर माणसांवर हवेतील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम होत असून त्यांना शब्द उच्चारताना आणि साधी सोपी गणिते सोडवताना अडचणींचा सामना करावा लागतोय असे या अभ्यासात दिसले आहे.

नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. एकूणच माणसाची ज्ञान अर्जित करण्याची जी क्षमता आहे त्यावर हवेतील प्रदूषणाचा प्रभाव पडतो आहे. हवेतील वाढत्या प्रदूषणकारी घटकांमुळे माणसाचे शाब्दिक आणि गणिती कौशल्य कमी होत आहे असे वॉशिंग्टन स्थित इंटरनॅशन फूड पॉलिसी रिसर्च संस्थेने म्हटले आहे. याले आणि इंटरनॅशन फूड पॉलिसी रिसर्चने संयुक्तपणे हा अभ्यास अहवाल तयार केला आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसत असून वयस्कर व्यक्तिंची स्थिती खूपच वाईट आहे असे या अहवालात म्हटले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान एकूण ३२ हजार चिनी नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात गणितापेक्षा शब्द उच्चारताना जास्त अधोगती असल्याचे दिसून आले. पुरुषांमध्ये वाढत्या वयानुसार शब्द उच्चारताना जास्त अधोगती होती तर जे कमी शिकलेले होते त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त होते. भारतात दरवर्षी हवाई प्रदूषणातून होणाऱ्या आजारांमध्ये मोठया प्रमाणावर मृत्यू होतात. चीन मध्ये प्रदूषणाची जी पातळी आहे त्याची भारताबरोबर तुलना होऊ शकते. त्यामुळे भारतासाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे.