उत्तर भारतामध्ये मंगळवारची पहाट गडद धुक्यामध्ये उजाडली असून पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण इतके होते की त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना  पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. या संस्थेने सद्यस्थितीत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सुदृढ व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वाईट असे वातावरण असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडी सुरू होताच राजधानी दिल्लीत काळे धुके दाटण्यास सुरुवात झाली असून हा वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश व हरयाणा या राज्यांनी हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत अशा  शब्दात राष्ट्रीय हरित लवादानेही या राज्यांच्या सरकारांना फटकारले आहे. मात्र दिल्लीमधील धुरक्याने आज धोक्याचीही पातळी ओलांडल्यामुळे सरकारला शाळांना सुट्टी करावी लागली. दिवसा नागरिक आणि शालेय विद्यार्थी मास्क घालून शहरांत फिरत होते.

हरित लवादाची टीका

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी एका याचिकेवरून राज्य सरकारांवर टीका केली असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून आधीच उपाययोजना करण्याची गरज होती असे म्हटले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील हवेची स्थिती अतिशय वाईट असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, प्रदूषणाची पातळी एवढी जास्त आहे की मुलांना श्वास घेणे कठीण जात आहे. त्यामुळे आमच्या सूचनेनुसार तुम्ही हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे का सोडले नाहीत.

राज्य सरकारांनी प्रदूषणाची स्थिती थंडीच्या दिवसात जास्त उग्र असते हे माहिती असताना आगाऊ उपाययोजना का केल्या नाहीत याचे उत्तर द्यावे असा आदेश लवादाने दिला आहे.

सीआयएसएफ जवानांना मास्क

दिल्ली विमानतळावर काम करणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना नऊ हजार मास्क पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सुरक्षा दलाचे संचालक ओ. पी. सिंह यांनी विषारी धुक्यापासून जवानांचे रक्षण करण्यासाठी नऊ हजार मास्क मागवले आहेत. त्यातील २ हजार मास्क तातडीने मिळणार असून सात हजार मास्क नंतर ठिकठिकाणच्या सीआयएसएफ जवानांना दिले जातील, गेल्य वर्षी नोव्हेंबरमध्ये सीआयएसएफने अशाच प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या.

झाले काय?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७, १८ व १९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार दिल्लीतील हवेचा दर्जा भीषण झाला आहे.  दिल्लीत मोटारींची संख्या अधिक असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, शिवाय कचरा जाळण्याने त्यात भर पडत आहे.

मंगळवार सकाळपासून दिल्ली आणि उत्तर भारतामधील हवेचा शुद्धता निर्देशांक घसरला. काही भागांतील दृश्यता २०० मीटपर्यंतचा परिसरापर्यंत घटली. पंजाब, हरयाणा आदी राज्यांतही अशीच स्थिती होती. लहान मुले प्रौढांहून अधिक वेगाने श्वास घेत असल्यामुळे त्यांच्यावर या धुरक्याचा तीव्र परिणाम होत असल्यामुळे दिल्लीतील  अतिप्रदूषित वातावरणात शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी  ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने  सरकारकडे केली. त्यानंतर संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली.