एअरएशियाचे जे विमान बेपत्ता झाले ते विमान सागरतळाशी गेल्यानंतर अजूनही मृतदेह तरंगत आहेत. खराब हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. शोध घेणारी जहाजे सोनार उपकरणांचा शोध घेत असून एअर एशिया फ्लाइट क्यूझेड ८५०१चा सांगाडा जावा समुद्राच्या तळाशी असल्याने तेथेच शोधाचा केंद्रबिदू आहे. तेथे नेमके काय आहे हे अजून समजलेले नाही.
एअरबस ए ३२० २०० रडारवरून दिसेनासे झाल्यानंतर त्याचा सांगाडा करिमता सामुद्रधुनीत पंगकलानबन येथे सापडला असला, तरी कुठलेही तुकडे बाहेर काढण्यात यश आलेले नाही. पाणबुडे तेथे मृतदेहांचा शोध घेत असून ब्लॅक बॉक्स फ्लाईट रेकॉर्डर्सही शोधले जात आहेत. तेथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू आहे, वेगाने वारे वाहत आहेत व ३ मीटरच्या लाटा उसळत आहेत. सात मृतदेह हाती आले आहेत, अगोदर ४० मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले होते पण त्यात आता दुरूस्ती करण्यात आली असून दोन स्त्री व दोन पुरूष अशा चौघांचे मृतदेह सापडले आहेत. मदतकार्य प्रमुख सोएलिस्टो यांनी सांगितले की, खराब हवामान आहे त्यामुळे मदतकार्य शक्य होत नाही. हवामान सुरळीत होताच मृतदेह बाहेर काढले जातील. या विमानात १५५ प्रवासी होते; त्यात एक ब्रिटिश, एक मलेशियन व एक सिंगापुरीयन व तीन दक्षिण कोरियन होते. जास्त म्हणजे १४९ प्रवासी हे इंडोनेशियाच्या नागरिकांचे होते. त्यात सतरा मुले होती. विमानाचा हवाई संपर्क कसा तुटला हे कोडे अजून उलगडलेले नाही. सोनार तंत्रज्ञानाच्या मदतीने विमानाचा सांगाडा शोधण्यात यश आले आहे.